उमरगा आणि सोलापूर साईट वरुन येताना,
वेळ मिळाला, आणि... खांद्यावरील सॅक मध्ये, ढकलून- दाबून भरलेले क्षण-
- ती मग्न आजीबाई, शांतपणे अधून मधून चहाच्या घुटक्याबरोबर, आपल्याच नादात, सावलीत पसरलेल्या मनोहारी वाकळेवर सुई दोऱ्याने वीण विणताना, एक स्वप्न साकारताना
- नेमका आजच बेगमपूर गावचा बाजार, थोडेसे आत असलेले हे गाव, आजूनपण तशी शहरी झळ न बसलेले... आपल्याच वेगळ्या छटांमध्ये, जुनाट पोतांमध्ये सावरून राहिलेले..
- बेगमपूर ला जायचं कारण म्हणजे, बऱ्याच वेळेला रस्त्यावरुन जाताना, विस्तीर्ण मोकळे पात्र असलेल्या भीमा नदी किनारी दिसणारी एक जुनाट किल्ला वजा असणारी, कुतूहल जागवणारी, खंडहरी रचना.. त्याचे कुतूहल आज भेट दिल्यावर उलगडले.. बेगमबी- औरंगझेबची कन्या, तिची ही कबर... किल्ल्यासारख्या भिंती व बुरुजांनी संरक्षलेली, नारळांच्या झाडांमध्ये वसलेली.. अतिशय सुंदर व शांत परिसर.. पण दुर्दैवीपणे दुर्लक्षित असलेला... आणि हो, मुस्लिम व हिंदू बांधव येथे नमन तसेंच पूजा देखील करतात.. येथे पुजारी देखिल आहे, त्यानेच आम्हाला ही माहिती दिली... येथे जर रेखाटन केले नसते तर खंत राहिली असती..
- त्याच पुजाऱ्याने सांगितले की, नदीच्या पलीकडेच एक छोटा पडका किल्ला, भिंती आहेत, औरंगझेब म्हणे तेथे राहत होता, त्याजवळच एक सुंदर सिद्धेश्वर मंदिर देखिल आहे.. मग काय, तेथे जाणे आवर्जुन आलेच..
- भीमा नदी किनारी असलेले, लांब पायऱ्या उतरून, खालच्या बाजूला असलेले सिद्धेश्वर मंदिर म्हणजे एक अतिशय शांत, एकांत, अध्यात्मिक, सुंदर परिसर.. खूप जुने असलेलं पिंपळ वृक्ष, मस्त देखणा.. आपल्या फांद्या लांबवर पसरवून, जणू त्या मंदिराला कवेत घेण्याचा त्याचा आनंदी प्रयत्न...
ते क्षण आता गाडीत बसून , सॅक मधून बाहेर काढत, शब्दात मांडण्याचा छोटासा प्रयत्न 
मिलिंद रणदिवे.
©
©







No comments:
Post a Comment