Tuesday, March 24, 2020

निमित्त होते, या नवरात्रीत, पहिल्याच दिवशी कुलदैवताला, उस्मानाबाद जिल्ह्यातील सोनारी या छोट्या गावातील काल भैरवनाथला, सर्व रणदिवे परिवारासह जाण्याचे.. तसे, अशा प्रकारची यात्रा, म्हणजे मी निरुत्साहीच... पण, सर्व परिवार असल्यामुळे जाणे क्रमप्राप्त होते..
वाटले, याबरोबर, आपलेही एखादे पिलग्रीमेज होते का, आपल्या टेस्ट चे एखादे ठिकाण शोधून..
गुगल धुंडाळता, जवळच हा सापडला... हे भलामोठा, अवाढव्य, सशक्त, अगदी गावाच्या मध्यात, ST स्टॅन्डजवळ.. धिप्पाड- परांड्याचा भुईकोट किल्ला. १५ व्या शतकात, बहामनी सुलतानाच्या वतीने याची बांधणी झाली. मधील २ वर्षे तो शहाजी महाराजांकडे देखील होता. सरतेशेवटी, तो हैद्राबाद च्या निझामाच्या ताब्यात होता.
किल्ल्याभोवती भलामोठा खंदक (आता त्याचे स्वरूप हलाखीचे) त्यानंतर असलेल्या, न शोभणाऱ्या, अस्ताव्यस्त उगवलेल्या टपऱ्या.. त्यांच्यामधून, केविलवाणा चेहरा करून आपल्याकडे हा याचनेने बघणारा.. एक घाणेरड्या बोळातून जाणारा याच्या प्रवेशद्वाराकडे जाणारा मार्ग, शोधून काढला.. उग्र दर्प सहन करत खंदक ओलांडता, त्याने हळूच स्माईल दिली.. त्याची भव्य, उंच निमुळती होत जाणारी बुरुजवजा भल्या मोठ्या भिंतींची नागमोडी रचना, त्यातून कधी निमुळता, कधी मोठा मार्ग, चालताना धडकीची जाणीव व्हायची. आतील बऱ्याच रचना पडझडीच्या असल्या तरी त्यांचे एकूण दृश्य अनुभवण्याजोगे आहे. लहानमोठे चौथरे, कमानी, भिंती, खोल्या , बुरुज वगैरेंनी हा व्यापलेला आहे... त्यांच्यामधील पडझडीचे अवकाश, काळ यांचा मनोसक्त आस्वाद एक वेगळीच पर्वणी... फिरता फिरता येथे एक मस्त पायऱ्यांची विहीर देखिल आढळली, ३ मजले जमिनीखाली, जाड कमानांच्या रचनांनी घडवलेली.. अपेक्षेप्रमाणे पाणी घाण व हिरवे.. पण एकंदरीत रूप देखणे.. सध्या हे सरांक्षित स्मारक, ASI कडे आहे.. इतर स्थळांप्रमाणे याची अवस्था एवढी चांगली नाही.. पण थोडा हा सशक्त असल्यामुळे, तग धरून आहे..
अशा ठिकाणी रेखाटन नाही झाले तर नवलच.. पण वेळ कमी होत म्हणून, याला सलाम करून, थोडे जरा आवरतेच घेतले..

 


No comments:

Post a Comment