Thursday, August 27, 2020

अणदूर

मी,

माझ्यासमोर,
पावसात भिजनारा तलाव अणदूर...
थोडे दूर,
पलीकडे, किनाऱ्यावरील ती न्हाहलेली टेकडी...
अजून दूर,
त्या हिरव्यागार टेकडीपल्याड,
ती निळी टेकडी...
घरंगळणाऱ्या, पानेरी जलरंगात निथळलेली,
दूर दूर, अजून दूर,
तिचेच पानेरी जलरंग, वर करड्या आकाशात उफाळून येणारे...
त्याहीपलीकडे, अजून दूर,
तो आकाशी करडा रंग, दूर दूर शुभ्रात लोप पावलेला...
हे,
हे हे सर्व,
झर्र्कन..
छपरावरील, त्या गवत काडीवरून घरंगळणाऱ्या,
इवल्याशा थेंबात एकवटले...
टपकन, खाली पडले...
जमिनीमध्ये विरून गेले, नाहीसे झाले...
माझ्यासमोर,
माझ्यासह.

22.08.20

Wednesday, April 29, 2020

C O  O   L  ......
random brush strokes with acrylic on discarded wooden floor sample..


काही वर्षांपूर्वी, हिमालयाच्या अंतरंगात भटकताना (तशी ही मित्रांसोबत रस्त्याने केलेली मनाली- लेह- द्रास- कारगिल- श्रीनगर ट्रिप) थोडे off route म्हणून बारलाछा ला पास आणि लाचुलनग ला पास मधील अवाढव्य पसरलेल्या सारचु तलाव ला जायचे होते..
प्रवासा दरम्यान जिस्पा व्हॅली मध्ये मुक्काम होता.. ठिकाण सुंदर होते. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून फेरफटका मारताना बाजूला एक सुंदर छोटी नदी होती.. सकाळची सुंदर सूर्य किरणांनी आजूबाजूची हिमाच्छादित शिखरे चमकत होती... अत्यंत सुंदर, उल्हासित वातावरण..
नदी असल्यामुळे आजूबाजूला, वेगवेगळ्या आकारांचे, रंगांचे बरेच गोल मटोल, गोटे पसरलेले होते... मनामध्ये आले, याचा उपयोग करून जर काही या निसर्गाच्या सौन्दर्यात शिल्पे, रचना निर्माण केल्या तर.... आणि या अवाढव्य हिमालयाला समर्पित केल्या तर, त्याची प्रति एक प्रकारचा आदर, कृतज्ञता व्यक्त केला तर..

आणि लगेचच काम चालू केले... आजूबाजूचे, जसे समर्पक ठरतील तसे, साधारण संकल्पना मनात ठेवून काम चालू केले.... व बऱ्याच काही रचनांनी आकार घेतला.. यांच्या सानिध्यात मी थोडा वेळच असणार आहे, याची कल्पना होतीच.. यांचे पुढे काय होईल.. काय माहित,

त्या अजून देखील तेथे असतील का, का लय पावल्या असतील, विस्कटल्या असतील, नाहीश्याच झाल्या असतील... त्या ग्रेट हिमालायलाच माहीत
Acrylic on Canvas.
Size- 3'-0" × 3'-0" (900mm × 900mm).
Tools- brushes n knife.

My first large canvas painting effort... The canvas i brought almost 6 months back but could not dare to put the colours.... some kind of fear or inability to deal with such large size..
Somehow, finally I could overcome this challenge in this corona vacation with available resources and took around 30 hours, in 6 days.

I decided to give a try to capture the glory of fabulous Jain temple complex at Palitana (Bhavnagar District in Gujrat) on Shatrunjaya Mountains. This was my solo trip almost 12 years back.
Palitana is the world's only mountain (elevation- 7300 ft., 2250mt.) that has more than 900 temples The Palitana temples and whole mountain are considered the most sacred pilgrimage place (tirtha) by the Jain community, and is the world's largest Temple Complex. A must visit place for explorers..
(Info.- Google)

Tuesday, March 24, 2020

'सराय'...

सर्व क्षेत्रातील कलावंत, विचारवंत नि उत्सुक माणसांसाठी ची मुक्त स्वागतशील अशी कोल्हापूर मधील आमची एक नवी जागा. जिथं यापुढे कला- संस्कृती, सामाजिक किंवा अन्य विषयांवर आपल्या चर्चा, संवाद नि मनमुराद मोकळ्या गप्पा होतील. अशी व्याख्याने, कार्यशाळा, प्रदर्शन आणि सादरीकरणासाठी च्या निसर्ग सहवासातील वास्तूचे, अवकाशाचे उदघाटन कलावंत 'जयंत जोशी' व मान्यवरांचे हस्ते...... आपण जरूर भेट द्या...





काश, ये बाथरूम कि दिवारेे, मै ऐसे हि छोड देता....

वाढदिवस....
दरवर्षी प्रमाणे, १० मे ला माझा बर्थडे.. खूप खूप लोकांकडून शुभेच्छा.. happy birthday.. happy birthday. हॅप्पी बर्थडे, तसा वरवरचा शब्द.. पण, त्यामागील भावना महत्वाच्या, त्या सर्व भावनांना माझे मनःपूर्वक धन्यवाद.
Happy birthday चं मराठीत रूपांतर- आनंदी जन्मदिवस किंवा जन्मदिवसा चे निमीत्त साधून आनंद सोहळा...
पण मराठीत याच दिवसाकरिता एक छान शब्द- वाढदिवस, व्वा, किती छान आणि अगदी समर्पक. उत्तरोत्तर आपली वाढ होत असते, मग ही वाढ वयामधली असेल, अनुभवांची असेल, जाणिवांची/ संवेदनांची असेल, नातेसंबंधातील, मित्र मैत्रिणींची असेल, आपल्या कार्यांची आले, अस्तित्वाची असेल, आपले छंद/ आवड जोपासण्यामधील असेल..... असे असे बरेच काही.. या सर्व लहान सहान गोष्टींमुळे, माझ्यात झालेली व्यक्तिमत्व वाढ, सर्वसमावेशक दृष्टीकोण यांची जाण, या सर्वांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस, त्यांना नमन करण्याचा दिवस- वाढदिवस. _/\_ _/\_
मिलिंद रणदिवे
उमरगा आणि सोलापूर साईट वरुन येताना, 





वेळ मिळाला, आणि... खांद्यावरील सॅक मध्ये, ढकलून- दाबून भरलेले क्षण-
- ती मग्न आजीबाई, शांतपणे अधून मधून चहाच्या घुटक्याबरोबर, आपल्याच नादात, सावलीत पसरलेल्या मनोहारी वाकळेवर सुई दोऱ्याने वीण विणताना, एक स्वप्न साकारताना
- नेमका आजच बेगमपूर गावचा बाजार, थोडेसे आत असलेले हे गाव, आजूनपण तशी शहरी झळ न बसलेले... आपल्याच वेगळ्या छटांमध्ये, जुनाट पोतांमध्ये सावरून राहिलेले..
- बेगमपूर ला जायचं कारण म्हणजे, बऱ्याच वेळेला रस्त्यावरुन जाताना, विस्तीर्ण मोकळे पात्र असलेल्या भीमा नदी किनारी दिसणारी एक जुनाट किल्ला वजा असणारी, कुतूहल जागवणारी, खंडहरी रचना.. त्याचे कुतूहल आज भेट दिल्यावर उलगडले.. बेगमबी- औरंगझेबची कन्या, तिची ही कबर... किल्ल्यासारख्या भिंती व बुरुजांनी संरक्षलेली, नारळांच्या झाडांमध्ये वसलेली.. अतिशय सुंदर व शांत परिसर.. पण दुर्दैवीपणे दुर्लक्षित असलेला... आणि हो, मुस्लिम व हिंदू बांधव येथे नमन तसेंच पूजा देखील करतात.. येथे पुजारी देखिल आहे, त्यानेच आम्हाला ही माहिती दिली... येथे जर रेखाटन केले नसते तर खंत राहिली असती..
- त्याच पुजाऱ्याने सांगितले की, नदीच्या पलीकडेच एक छोटा पडका किल्ला, भिंती आहेत, औरंगझेब म्हणे तेथे राहत होता, त्याजवळच एक सुंदर सिद्धेश्वर मंदिर देखिल आहे.. मग काय, तेथे जाणे आवर्जुन आलेच..
- भीमा नदी किनारी असलेले, लांब पायऱ्या उतरून, खालच्या बाजूला असलेले सिद्धेश्वर मंदिर म्हणजे एक अतिशय शांत, एकांत, अध्यात्मिक, सुंदर परिसर.. खूप जुने असलेलं पिंपळ वृक्ष, मस्त देखणा.. आपल्या फांद्या लांबवर पसरवून, जणू त्या मंदिराला कवेत घेण्याचा त्याचा आनंदी प्रयत्न...
ते क्षण आता गाडीत बसून , सॅक मधून बाहेर काढत, शब्दात मांडण्याचा छोटासा प्रयत्न 
मिलिंद रणदिवे.
©


ते चिंचेचे झाड, मज दिसे.....
 

ऐनापूर गावी, माझ्या आजोळी, मामाच्या मळवितील, अरुंद पायवाटेवर असलेला हा जुनाट चिंचेचा वृक्ष... त्याचे वय काय? कुणालाच माहीत नाही. माझ्या लहानपणापासून, याच्याशी दबकतच असलेला संवाद... कधीच संपणार नाही. त्याचं भयावह रूप, आकार अगदी जसा.. लहानपणी ऐकलेल्या गोष्टींमध्ये.. एक पिशाच्च चेटकीण चिंचेच्या झाडावर राहायची.. याला नेहमी पाहताच.. अशीच काहीशी भावना, मनाला स्पर्श करून जायची..
पण नाही, तसा नाही तो.. तो आहे प्रचंड अनुभवी, राकट, कडक, सुरुकतल्यासारखा दिसणारा, पण आतून प्रचंड ऊर्जा असणारा, येणाऱ्या जाणाऱ्यांबरोबर सहज, गोड जिव्हाळा साधणारा.. अगदी माझ्या आजोबांसारखा, तात्यांसारखा..
मिलिंद रणदिवे । १७'०५'१९

डी. डी. बराले, 

डी. डी. बराले, हे नाव कोल्हापूर करना माहिती नाही, असे शक्यच नाही.. बिंदू चौक मधील, पहिल्यांदा लक्ष्य वेधुन घेणारा ठळक, ठसठशीत देवनागरी फलक... त्याचे 'रेखाटन' ग्रुप बरोबर रेखाटन करताना, जुन्या आठवणी ताज्या झाल्या.. nostalgic Kolhapur..

We witness such scenes (burning and slowly murdering trees, as it is illegal to cut). This huge old Banyan tree, on the Vijaydurga fort is also victim of this.. standing helplessly.. Probably I will not see him after some time.. Many such small big trees are being burnt and killed there.. 
Inspite these acts... I think they try to forgive people, and express feelings through their beautiful patterns, textures..

कोल्हापूर मधील रंकाळा आणि रंकाळ्यामधील संध्यामठ, 


त्याच्या तटावरच असणारा शालिनी पॅलेस, मागील बाजूस असणारा परताळा (स्थलांतरित पक्ष्यांचे पूर्वीचे हक्काचे स्थान)... म्हणूनच हा परिसर म्हणजे कोल्हापूरचे मोठे वैभव, अगदी पुरातन काळापासून..
संध्यामठ वर, कोल्हापूरच्या कित्येक कलाकारांनी चित्रे रेखाटली अगदी आबालाल राहिमान सारखे कित्येक आर्टिस्ट या परिसराच्या प्रेमात होते. बाबुराव पेंटर, भालजी पेंढारकर सारख्या दिग्दर्शकांनी या परिसरात चित्रीकरण करण्याची संधी सोडली नाही..
संध्याकाळच्या तांबड्या, पिवळ्या आकाशाच्या पार्श्व भूमीवर, गडद काळ्या संध्यामठाची आकृती बहुतेक सगळ्या छायाचित्रकारांनी चितारली, अगदी आत्तासुद्धा नवखे छायाचित्रकरांची मांदियाळी येथे नेहमी असते.. असा हा सुंदर परिसर.
रेखाटन स्केचिंग ग्रूप ने येथे पहिल्यांदाच स्केटचिंग संडे ठेवला... आणि या रम्य वातावरणात, रविवारची सकाळ झकास झाली.. या निमित्ताने मला पहिल्यांदाच या परिसराचा सहवास लाभला... धन्यवाद कोल्हापूर.
रेखाटन करताना जाणीवपूर्वक मागील अशोभनीय नवीन बिल्डिंगच्या रेखाकृती टाळल्या
02'05'2019

सुंदर माझं कोल्हापूर.


अजूनही काही खूप छान सुंदर जुन्या इमारती येथे दिमाखाने उभ्या आहेत. त्यापैकी ही एक...
पूर्वीचा कागलकर वाडा, नंतर येथून जिल्हा परिषदेचा कारभार चालला. समोरीलच असणाऱ्या नव्या टिपिकल इमारती मध्ये जिल्हा परिषद स्थलांतरित झाली, आणि ही वास्तू मोकळी झाली, पण अजूनही काही कचेऱ्या येथे आहेत.
काळ्या घडवलेल्या दगडातील, बरोबर सुंदर लाकूड काम , वरील उतरते छप्पर.. एक सुंदर मिलाफ. दगडातूनच बनविलेल्या फ्लॅट कमानी व आकर्षकरित्या बरोबर मध्ये, आकाराने मोठा असलेला की स्टोन लक्ष्य वेधून घेतल्याशिवाय राहत नाही.
रेखाटनाच्या, ग्रुपच्या माध्यमातून यांना अनुभवण्याची संधी मिळते, त्यामुळे या ग्रुपचे व अशा छंदाचे मनःपूर्वक धन्यवाद.
१६'०६'२०१९
मिलिंद रणदिवे


अडगळीतील- विठ्ठल मंदिर 

रेखाटनाला, कोणतेही कोल्हापुरातील ठिकाण सुचले नाही की, हमखास जाण्याची जागा.. गावातीलच, अडगळीतील- विठ्ठल मंदिर कॉम्प्लेक्स.. तसा छोटेखानीच, आपल्या आपणच निर्माण झालेला, पण नेहमी जिवंत असणारा.... प्रत्येक वेळी एक नवीन अनुभव देणारा, जिव्हाळा लावणारा....
नेहमी गजबजलेला, जीवंत, स्वतःचे, वेगळे च भारदस्त व्यक्तिमत्त्व असलेला.... आजूबाजूला असलेल्या, अस्ताव्यस्त उगवून आलेल्या टपऱ्या, बोर्डस नजरेआड केले की... मग तो अजूनच खुलतो, मस्त कटाक्ष देतो... कोल्हापुरातील भवानी मंडप... याला दुसरा पर्यायच नाही, अजूनतरी..
शाळेत असताना, 


जवळपास झाली असतील ४० एक वर्षे, म्हाताऱ्या आई (आजीला, आम्ही म्हातारी आई म्हणायचो) बरोबर कधीतरी, या मिरजकर तिकटी चौकातील, जुन्या दत्ताजीराव शेळके शाळेला आल्याचे बारीकसे आठवते. माझी आजी शिक्षिका होती. काही कामानिमित्त येथे आम्ही, तपोवन मधील घरापासून चालत आलेलो..
तसे पायी येणे बऱ्याचदा व्हायचे, अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी. प्रत्येक वेळी, येथील, बाजूलाच असलेले शेषशायी विष्णू मंदिराला आवर्जून भेट. त्यावेळी मला नेहमी प्रश्न पडायचा, याला मंदिर कसे म्हणायचे, कारण, याला तर साध्या भिंती आणि वर उतरते कौलारू छप्पर, आजूनदेखील ते तसेच आहे. यालाच लागून असलेला, शाहू महाराजांच्या काळातील, जमिनीवरील पाण्याची टाकी आणि त्याला असलेल्या जुन्या चाव्या, ती देखील अजून तशीच आहे..
आणि हो तो काळा दगडी मिनार, चौकाच्या बरोबर मधी असलेला. त्यावरील कोरलेली पणती, सूर्य आणि साल, त्याकडे पाहताच क्षणी नजरेत यायचे. याच्या भोवताली असलेल्या दगडी पाकळ्या, त्या मात्र रंगवलेल्या, अगदी पूर्वीसारख्या.. बदल काय तो फक्त ग्रील मध्येच.. गणपती वेळी, त्याकाळी येथे दरवार्षि एकच सिन- लाईट च्या माळांनी सजवलेली, ड्राइवर विना, गोल फिरणारी रिक्षा. नेहमी त्याचे अप्रूप वाटायचे....
आजच्या रेखाटनानिमित्त, या सगळ्या आठवणी मनामध्ये ताज्या झाल्या.. I think, sketching is a very good media to connect with the place and the time...
धन्यवाद रेखाटन..
मिलिंद '२५'०८'२०१९
आजचे रेखाटन, 


माझ्या लहानपणीच्या शाळा परिसरात.. तपोवणात. एकेकाळी अतिशय रम्य, झाडीने गर्द, पशु पक्ष्यांचे वास्तव्य असलेला हा परिसर. दीक्षित गुरुजींचा आश्रम. दीक्षित गुरुजींनी येथूनच विद्यापीठ शाळा चालू केली. शाहू महाराजांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन ही काही दशपट एकरात असलेली ही जमीन गुरुजींना दिली. या पवित्र भूमीला गांधीजी, विनोबा भावे, जयप्रकाश नारायण यांसारख्या व्यक्तिमत्वांचे पाय लागले, त्यांचे वास्तव्य झाले. अशा या भूमीस माझे नेहमीच वंदन.
काही पडक्या इमारती, घरे येथे आजही, त्या जुन्या क्षणांची आठवण करून देतात.
सोबत चितारलेले हे पडके घर- अरविंद भुवन, स्वातंत्र्य सेनानी सरनाईक सर, गुरुजींच्या काळात रहात. भारदार व्यक्तिमत्व, नेहमी पांढरा सदरा, कडक इस्त्री, तशीच पांढरी विजार, खाकी जॅकेट, डोक्यावर गांधी टोपी.. त्यांच्या पत्नी तशाच, सरोजिनिदेवी नायडू सारख्या दिसायच्या त्या. फरक फक्त, कपाळावर मोठे लाल कुंकू. दोघेजणच राहायचे ते तिथे.. सोबत असलेले मोठे वडाचे झाड. आम्हाला हा परिसर बराच भयाण वाटायचा.. त्यावेळी.
माझे भाग्य की, दीक्षित गुरुजींचा मला कळत्या वयात थोडातरी सहवास लाभला.. आज रेखाटनानिमित, या भूमीवरील, त्या व्हायब्रेशनांची अनुभूती मी आज घेत होतो
या परिसराचे पावित्र्य खराब होत आहे, झाले आहे असे दिसून येते. ते परत यावे व राहावे, अशी माझी प्रार्थना
मिलिंद '१५'०९'२०१९'
काल, एकाच दिवसात, अचानकपणेच भेटलेले दिग्गज, काहिंची नवी ओळख, पण आपलेच वाटणारे, काही जुन्या रेशमी ओळखी, आणि अवचितपणे समोर ठाकणारे.... 'सराय' ने हेतुपुर्वकच घडवून आणले की काय, त्याच्याच उद्देशाची ओळख अधोरेखित करण्यासाठी.... अशा या सराय क्षणांचे, ते घडवून आणणाऱ्या माध्यमांचे मनःपूर्वक आभार.. 
सोबत- सुभाष अवचट सर, अन्वर हुसेनजी, सुहास एकबोटे, मिनू व शिल सडवेलकर, आर्किटेक्ट संजय पाटील, आर्कि. शिरीष बेरी आणि इतर सहचर..

निमित्त होते, या नवरात्रीत, पहिल्याच दिवशी कुलदैवताला, उस्मानाबाद जिल्ह्यातील सोनारी या छोट्या गावातील काल भैरवनाथला, सर्व रणदिवे परिवारासह जाण्याचे.. तसे, अशा प्रकारची यात्रा, म्हणजे मी निरुत्साहीच... पण, सर्व परिवार असल्यामुळे जाणे क्रमप्राप्त होते..
वाटले, याबरोबर, आपलेही एखादे पिलग्रीमेज होते का, आपल्या टेस्ट चे एखादे ठिकाण शोधून..
गुगल धुंडाळता, जवळच हा सापडला... हे भलामोठा, अवाढव्य, सशक्त, अगदी गावाच्या मध्यात, ST स्टॅन्डजवळ.. धिप्पाड- परांड्याचा भुईकोट किल्ला. १५ व्या शतकात, बहामनी सुलतानाच्या वतीने याची बांधणी झाली. मधील २ वर्षे तो शहाजी महाराजांकडे देखील होता. सरतेशेवटी, तो हैद्राबाद च्या निझामाच्या ताब्यात होता.
किल्ल्याभोवती भलामोठा खंदक (आता त्याचे स्वरूप हलाखीचे) त्यानंतर असलेल्या, न शोभणाऱ्या, अस्ताव्यस्त उगवलेल्या टपऱ्या.. त्यांच्यामधून, केविलवाणा चेहरा करून आपल्याकडे हा याचनेने बघणारा.. एक घाणेरड्या बोळातून जाणारा याच्या प्रवेशद्वाराकडे जाणारा मार्ग, शोधून काढला.. उग्र दर्प सहन करत खंदक ओलांडता, त्याने हळूच स्माईल दिली.. त्याची भव्य, उंच निमुळती होत जाणारी बुरुजवजा भल्या मोठ्या भिंतींची नागमोडी रचना, त्यातून कधी निमुळता, कधी मोठा मार्ग, चालताना धडकीची जाणीव व्हायची. आतील बऱ्याच रचना पडझडीच्या असल्या तरी त्यांचे एकूण दृश्य अनुभवण्याजोगे आहे. लहानमोठे चौथरे, कमानी, भिंती, खोल्या , बुरुज वगैरेंनी हा व्यापलेला आहे... त्यांच्यामधील पडझडीचे अवकाश, काळ यांचा मनोसक्त आस्वाद एक वेगळीच पर्वणी... फिरता फिरता येथे एक मस्त पायऱ्यांची विहीर देखिल आढळली, ३ मजले जमिनीखाली, जाड कमानांच्या रचनांनी घडवलेली.. अपेक्षेप्रमाणे पाणी घाण व हिरवे.. पण एकंदरीत रूप देखणे.. सध्या हे सरांक्षित स्मारक, ASI कडे आहे.. इतर स्थळांप्रमाणे याची अवस्था एवढी चांगली नाही.. पण थोडा हा सशक्त असल्यामुळे, तग धरून आहे..
अशा ठिकाणी रेखाटन नाही झाले तर नवलच.. पण वेळ कमी होत म्हणून, याला सलाम करून, थोडे जरा आवरतेच घेतले..

 


थेट भेट, 











एका साध्या पण जातीवंत, कलावंत अवलियाशी- संजय यमगर.. यांच्या सहवासात ४ तास कसे निघून गेले, कळलेच नाही.. यांचा एकच नाही पण वेगवेगळ्या कलाक्षेत्रातील व्याप प्रचंड.... तो सहजपणे समाजात, विद्यार्थ्यांत मिसळावा याकरिता त्यांची मेहनत, प्रयत्न अथक...
आपण कधीही सातारा पुणे प्रवास करत असाल तर, थोडी वाट वाकडी करून सुरुर- वाई रस्त्यावर, मॅप्रो गार्डन समोरील यांच्या स्टुडिओला, गॅलरीला जरूर भेट द्या.. एक भारदार, हसतमुख व्यक्तिमत्व आपले स्वागतच करेल..
लौकरच ते आपल्या 'सराय'ला, वर्कशॉप घेण्यासाठी भेट देतील.. 
कोजागिरी इन खिवा, उझबेकिस्तान..
या शीतल चंद्र प्रकाशात येथील उत्कृष्ट अशा रचना, खंडहर न्हाऊन निघालेले.. त्या शांत रात्री, वाळवंटातील थंड वाऱ्याच्या झुळकेबरोबर, एक अनामिक, निःशब्द संवाद त्या आकारांबरोबर, आकार घेत होता. चंद्र प्रकाशामुळे झालेल्या शेडस्, प्रकाश छटा, उजळलेले त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण रंग, त्या वातावरणात एक चैतन्य निर्माण करीत होता.. आणि मी शांतपणे त्यांच्यातच समरस होऊन, एक वेगळीच अनुभुती घेत होतो...
मिलिंद '१३'१०'१९'
ताटात भात येण्यापूर्वी,
त्याचा जमिनीपासूनचा ताटापर्यंतचा प्रवास फारच मेहनती, परावलंबी, निसर्गाच्या मूडशी मिळते जुळते घेणारा तरीही रंजक... हा प्रवास चालू होतो साधारण एप्रिल/ मे पासून ते आतापर्यंत, दिवाळीपर्यंत... त्यामध्ये यासाठी जमीन योग्य करणे, नांगरणे, ती उन्हात तापविणे, मृग नक्षत्राची चाहूल लागली की भात पेरणी करणे.. पाऊस वेळेत पडला तर ठीक, नाहीतर सगळे कष्ट वाया.. पाऊस झाल्यानंतर, मग हळुवार याला हिरवेगार कोंब फुटतात.. जमिनीच्या बाहेर येऊन, वातावरणाचा आस्वाद घेण्यासाठी आसुसलेले, जशी लहान बाळेच ती... वाऱ्याच्या, पावसाबरोबर हेलकावे घेत, आनंद घेत ती वाढु लागतात.. आजूबाजूचे तन, वेळच्यावेळी भांगलन करून काढले जाते.. त्यांची वाढ अजून सहज होते... असे करत करत साधारण नवरात्रीच्या वेळेस त्यांच्या मधून हळुवारपणे लोम्ब्या डोकावू लागतात.. मग अजून काळजी घ्यावी लागते... पावसाची साथ इथपर्यंत तर आवश्यक असते, मग तो परतायला लागतो.. पण त्याचा कल बदलला तर सगळे अवघड.. अवघे उभार पीक आडवे होऊ शकते... मग आली कापणी... पूर्वी बाय लोक आनंद गाणी म्हणत कापणी करायच्या... या सर्व प्रवासातून, मग हा आजचा दिवस, मळणीचा दिवस, या कष्टातून उभारलेल्या समाधानाचा दिवस.. नंतर या भाताला थोडे ऊन दिले जाईल, चांगले वाळवले जाईल आणि ३/४ महिन्यांनी त्याची कांंडपनी होऊन त्यातून मस्त तांदूळ बाहेर पडतील... आणि मग आपल्या समोरच्या ताटात तो, भात म्हणून येईल, आपली भूक भागवायला.... (वदनी कवल घेता, नाम घ्या ..... )


माझ्या कोल्हापूर शेजारील छोट्या शेतातून, माझी आई तसेच तीचे इतर सहकारी आज मळणी करताना..
मिलिंद '०२'११'२०१९'
Quick sketching in Dubai..
 



कोल्हापुरातील एक vibrnt गल्ली, खाऊ गल्ली, 

केशवराव भोसले नाट्यगृह व कुस्तीच्या खासबाग मैदानाला खेटूनच असलेली... आठवड्यातून एकदातरी कोल्हापूरकर, जिभेचे चोचले पुरवण्यासाठी नक्कीच येथे भेट देणार.. आणि हो, या अस्ताव्यासतामुळे या शेजारील सुंदर जुन्या वास्तूंचे वैभव झाकोळलेय, हे देखील तितकेच खरे.....